कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करा; शरद पवार यांची केंद्राला विनंती

मुंबई नगरी टीम

दिल्ली : केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची मंगळवारी भेट घेतली. तसेच केंद्राच्या निर्यात बंदीच्या या निर्णयाला शरद पवारांनी विरोध दर्शवला आहे. तर केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती शरद पवारांनी यावेळी केली आहे.

केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली”, अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान पियुष गोयल यांची भेट घेतली. केंद्राच्या या निर्णयामुळे कोणत्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. तर कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे हा मुद्दा देखील त्यांनी मांडला.

या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे, अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो, ही बाबही शरद पवार यांनी पियुष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदी बाबत फेरविचार करावा, अशी विनंती शरद पवार यांनी पियुष गोयल यांना केली. दरम्यान, या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू. जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊ, असे पियुष गोयल यांनी स्पष्ट केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

Previous articleचीनच्या राजकीय-आर्थिक कोंडीचे धाडस मोदी सरकार कधी दाखवणार ?
Next articleम्हाडाकडून लवकरच मुंबई आणि ठाणेकरांना मोठं गिफ्ट, जितेंद्र आव्हाडांची महत्त्वाची घोषणा