राज्यपालांनी कंगणाची कान उघाडणी केली असती तर आनंद झाला असता!

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या,मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगणा राणावत यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो, महामहीमांवर दबाव होता का? हा संदेह जनतेत आहे. परंतु महामहिमांनी कंगणाला भेट दिली तरी ज्या त्वरेने मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहतांना बोलावणे धाडले तशीच कंगणा यांची कान उघाडणी केली असती तरी महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता,असे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सावंत पुढे म्हणाले की, महामहीम राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत तसेच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत.सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांची असते म्हणून मुंबई,महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या कंगणा राणावत यांना त्यांनी चार शब्द सुनवायला हवे होते, असे सावंत म्हणाले.

कसलेच ताळतंत्र नसलेल्या तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर बोलणाऱ्या कंगणा यांनी राज्यपालांचाही अवमानच केला आहे. राज्यपालांच्या भेटीवेळी त्यांनी महामहीम आसनस्थ होण्याआधी बसून आमच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे, असेही ते म्हणाले.

Previous articleनापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा महिन्याभरात घेणार : उदय सामंत यांची माहिती
Next articleनरेंद्र मोदींच्या काळात लोकशाही रसातळाला गेली : बाळासाहेब थोरातांची टीका