मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तब्बल १५ मंत्र्यांना कोरोना लागण झाली आहे. त्यापैकी १० मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उर्जामंत्री नितीन राऊत,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू हे रूग्णालयात उपचार घेत आहेत.राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच आता मंत्रालयातील मंत्र्यांच्या कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बाधा झाल्याने मंत्रालय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ झाल्याची चर्चा आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपटे घेतल्यानंतर आपल्या मतदार संघात उपाय योजनेसाठी झटणा-या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,वस्त्रोद्योगमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख,पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय बनसोडे,उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.तर उर्जामंत्री नितीन राऊत,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू हे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत.तर राज्याचे मुख्यालय असलेले मंत्रालय सध्या कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनत चालले आहे. मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.तर काहींना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्यात येत नसला तरी मंत्रिमंडळाच्या बैठकी दिवशी बुधवारी मंत्रालयात मोठी गर्दी बघायला मिळत आहे.आमदारांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अधिकारी आणि मंत्री कार्यालयात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या विविध बैठकांसाठी येणारे अधिकारी यांना त्यांच्याकडे बैठकीचे पत्र असल्यास त्यांना प्रवेश दिला जात आहे.तर काही मंत्री कार्यालयातून विशेष व्यक्तींना प्रवेश देण्यासाठी मंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांची पत्रे सुरक्षा व्यवस्थेला देण्यात येत असल्याने मंत्रालयात अभ्यागतांची मोठी गर्दी होत असल्याची चर्चा आहे.अशा गर्दीवर बंधने आणण्याची मागणी अधिकारी वर्गाकडून केली जात आहे.तर कार्यकर्त्यांच्या वाढत्या गर्दीमुळे मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहेत.महसूलमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित झाल्याने या मंत्र्यांची कार्यालये काही दिवस बंद ठेवण्यात आली होती.खबरदारी म्हणून काही विभागांनी आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करोनाची चाचणी करून घेतली आहे.