साहित्य संस्थांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ

साहित्य संस्थांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ
मुंबई दि. १० विविध वाड्‌मयीन उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि साहित्य विकासाचे कार्य करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासह इतर सहा प्रादेशिक साहित्य संस्थांना राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान दुप्पट करण्यात आले आहे. आता या संस्थांना 10 लाख रुपये एवढे अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
केवळ साहित्यावरील चर्चा व परिसंवाद एवढेच कार्यक्रमाचे स्वरुप राहू नये तर मराठी आणि इतर भारतीय भाषा यांच्यामध्ये परस्पर साहित्य व्यवहार वाढविण्यासाठीही प्रयत्न व्हावेत तसेच मराठी भाषेचे अंगभूत सामर्थ्य ओळखून आधुनिक आणि गतिमान युगातील आव्हाने पेलण्यासाठी मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून सर्वार्थाने विकसित करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जावेत यासाठी त्यांना देण्यात येणारे अनुदान वाढविण्यात आले आहे.
प्रादेशिक साहित्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागांमधील बोली भाषा, साहित्य व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठीही आज वाढविण्यात आलेल्या अनुदानाचा उपयोग होणार आहे. मराठी भाषा आणि साहित्य विकासासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व या महामंडळाच्या चार घटक संस्था म्हणजेच पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई येथील मुंबई मराठी साहित्य संघ, नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ आणि औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद तसेच रत्नागिरी येथील कोकण मराठी साहित्य परिषद आणि कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा अशा सात प्रादेशिक साहित्य संस्था कार्यरत आहेत.

Previous articleनांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी आज मतदान
Next articleराज्याचे दिव्यांग धोरण दोन महिन्यात जाहीर करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here