मुंबई नगरी टीम
नाशिक : राज्यातील ठाकरे सरकार मधील किमान १५ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असतानाच विधानसभा अध्यक्षांनतर आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांनी स्वत: समाज माध्यमातून दिली आहे.
दिंडोरीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाघ्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून दिली आहे.माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन.माझी तब्येत उत्तम आहे.असे त्यांनी म्हटले आहे.ठाकरे सरकार मधील १५ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यापैकी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,वस्त्रोद्योगमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख,पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय बनसोडे,उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उर्जामंत्री नितीन राऊत,शालेय शिक्षणमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू या मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विधानभनवातील कार्यालयामधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते कार्यालय बंद करण्यात आले आहे.त्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली.त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने,माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन असे आवाहन करतानाच माझी तब्येत उत्तम आहे असे झिरवाळ यांनी म्हटले आहे.नरहरी झिरवाळ हे पुढील आठ दिवस होम क्वारंटाइन रहाणार असून कोणालाही भेटणार नाही पण त्यांचे कार्यालय व कामकाज सुरूच राहील. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व कोणतीही अडचण असल्यास माझे स्वीय सहाय्यक धनराज भट्टड मो.- 9689345144 यांच्याशी संपर्क साधावा.तसेच सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या या कालावधीत आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.व कुठेही काम नसल्यास विनाकारण गर्दी करू नये.कामापूरते बाहेर पडल्यास मास्क लावावे व सामाजिक अंतर ठेवूनच कामकाज करावे.स्वत:ने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तरी आपले गावं,तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होईल आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेलाही सहकार्य करावे असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे.

















