मुंबई नगरी टीम
पुणे : कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही.तो पर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. गेल्या सात महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थिती महाविद्यालये सुरू केली जाणार नाहीत, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली. सावित्री बाई फुले विद्यापीठ येथे उदय सामंत यांनी आज बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना संबोधित केले.
याबाबत अधिक बोलताना उदय सामंत म्हणाले, राज्यात अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. काही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत.त्यात कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच ऑफलाईन परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. शिवाय राज्यातील ग्रंथालये देखील लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली.पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक अडचण येणार नाही, याबाबतची सर्व दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच 113 सेंटरवर ऑफलाईन परीक्षाचे नियोजन करण्यात आले आहे.याठिकाणीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यात येईल. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत परीक्षाचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.विद्यापिठ व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय रहावा, यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच 8 ऑक्टोबरपासून सराव प्रश्नसंच देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले आहे. परीक्षाबाबत प्रत्येक जिल्हयाला नोडल अधिकारी म्हणून प्राचार्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षा पासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.दरम्यान,एकीकडे कोरोनाची स्थिती निवळल्यानंतरच राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे लॉकडाउन शिथिलीकरणाच्या पार्श्वभूमीवर शाळा १० ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवानगी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शाळा सुरू करण्याबाबत कार्यपद्धती ठरवावी, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्हटले आहे.