सुशांतसिंह प्रकरणाचा भाजपच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही,दानवेंचे स्पष्टीकरण

मुंबई नगरी टीम

पुणे : एम्सच्या अहवालानंतर सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणात भाजपने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यावर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा भाजपच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही, असे म्हणत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच महाविकास आघाडीवरही त्यांनी टीकास्त्र डागले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच राज्यातील सरकार आम्ही पाडणार नाही. हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय घालून पडेल त्यात आमचा दोष नाही, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. एम्सच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर टीका करणारे चांगलेच तोंडावर आपटले आहेत. भाजपनेही हे प्रकरण लावून धरत पोलीस आणि राज्य सरकारवर टीका केली. यामुळे आता शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, आजच्या आयोजित पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांनी कृषी कायद्याबाबत देखील केंद्र सरकराची भूमिका स्पष्ट केली. गेली सहा वर्षे विरोधकांकडे मुद्दे नाहीत यासाठी ते कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर आरोप करत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. बाजार समित्या संपुष्टात येणार नाहीत. विरोधक चुकीचे आरोप करत असून आमच्याबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला.

Previous articleशिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न,भाजपच्या माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप
Next articleकोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तो पर्यंत एकही महाविद्यालय सुरू होणार नाही