मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातल्याने मूर्तिकारांना मूर्ती घडवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी या मागणीसाठी पेणच्या मूर्तिकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पीओपीच्या मूर्ती विसर्जनानंतर समुद्रात लवकर विरघळत नाही. त्याने प्रदुषणही होते. त्यावर तुम्ही वेगळा विचार केला पाहीजे असा सल्ला राज ठाकरे यांनी मूर्तिकारांना दिला. तसेच यासंदर्भात आपण सरकारशी चर्चा करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले असून सोबत एक धोक्याची सूचना देखील दिली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. पोओपीच्या मूर्ती लवकर विरघळत नाहीत. विसर्जनानंतर मूर्ती किना-यावर येतात. विर्जनानंतर अनेक चौपाट्या पाहिल्या तर किना-यावर असंख्य गणपतीच्या मूर्ती दिसतात. हे चित्र फार भीषण आहे. त्यामुळे तुम्ही एक वेगळा विचार करून बघा, जमतं का?. कारण उद्या जर परदेशातून मूर्ती आल्या तर, तुम्ही काहीही करू शकत नाही, अशी धोक्याची सूचना राज ठाकरे यांनी मूर्तिकारांना दिली. मूर्तिकारांच्या मागण्या जाणून घेताना राज ठाकरेंनी यावेळी त्यांना आश्वस्त देखील केले आहे.
केवळ मूर्तिमुळे जलाशयात प्रदुषण होते असे नाही. परंतु हा देखील त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे मूर्ति बनवण्याच्या दृष्टीने वेगळा काही मार्ग निघतो का याचा विचार तुम्ही करा. तर यासंदर्भातील वेगळ्या पर्यायाविषयी मी सरकारमधील एखाद्या व्यक्तीशी चर्चा करतो, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. दरम्यान, आतापर्यंत जिमचालक, मुंबईचे डबेवाले, बीज बिल ग्राहक, कोळी महिला, पुजारी, डॉक्टरांचे शिष्टमंडळ आदींनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. मनसेने उचलून धरलेल्या संबंधित अनेक मुद्द्यांवर राज्य सरकारला दखल घेण्यासही भाग पाडले. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मूर्तिकारांनाही सरकारकडून काही दिलासा मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.