एक जगह जब जमा हो तीनो.. अमर,अकबर,अँथनी!

मुंबई नगरी टीम

मुंबई : “राज्यातील सरकार आम्ही पाडणार नाही. हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय घालून पडेल त्यात आमचा दोष नाही”, असा टोला केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला होता. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याच शैलीत रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अमर-अकबर- अँथनी चित्रपटातील गाण्याचे बोल वापरत भाजपला चिमटा काढला आहे.

“रावसाहेब दानवे म्हणाले की, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे, कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!”, असे ट्वीट करत गृहमंत्र्यांनी रावसाहेब दानवेंना टोला हाणला आहे. अभिनेता सुशांतसिंह प्रकरणावरून भाजपने सत्तधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पंरतु एम्सच्या अहवालाने सर्व डाव पालटला असून आता सत्ताधारी भाजपला चांगलेच फटकारत आहेत.

कृषी कायद्यासंदर्भात केंद्राची भूमिका स्पष्ट करण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. “राज्यातील सरकार आम्ही पाडणार नाही. हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय घालून पडेल त्यात आमचा दोष नाही”, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते. कृषी विधेयकांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. बाजार समित्या संपुष्टात येणार नाहीत. विरोधक चुकीचे आरोप करत असून आमच्याबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला होता.

Previous articleउद्धव ठाकरे, शरद पवारांनंतर आठवलेंची एकनाथ खडसेंना ‘ही’ ऑफर
Next articleराज ठाकरेंकडून मूर्तिकारांना आश्वासन,पण ‘या’ धोक्याचीही दिली सूचना