उद्धव ठाकरे, शरद पवारांनंतर आठवलेंची एकनाथ खडसेंना ‘ही’ ऑफर

मुंबई नगरी टीम

मुंबई :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली असतानाच केंद्रीय मंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण त्यांना दिले आहे. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत जाऊन आता काही फायदा नाही. त्यापेक्षा त्यांनी रिपाईमध्ये यावे.त्यांना सत्तेत वाटा देण्याचे काम आम्ही करू,असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधीही रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आणि रिपाईसोबत येऊन महायुतीचे सरकार स्थापन करावे,असे म्हटले होते.तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील एनडीएमध्ये येण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले होते.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. जायचे होते, तर त्यांनी आधी जायला हवे होते. आता मंत्रिमंडळ फुल्ल झाले आहे. त्यापेक्षा त्यांनी रिपाईमध्ये यावे, त्यांना सत्तेत वाटा देण्याचे काम आम्ही करू. त्यांना सत्तेत यायचे असेल तर त्यांनी आताचे सरकार घालवले पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, एनडीएमध्ये येण्याचे आवाहन केल्यानंतर शरद पवारांनी रामदास आठवलेंवर बोचरी टीका केली होती. यावर भाष्य करत रामदास आठवले यांनी म्हटले की, शरद पवार माझे चांगले मित्र आहेत. मला गांभीर्याने घेणारे अनेक लोक आहेत. माझे ऐकणारा समाजात मोठा वर्ग आहे. ज्यांना माझे बोलणे पटत नसेल त्यांना मला गांभीर्याने घ्यायचे नसेल, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी दिले.

दोन महिन्यांवर आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बैठक पार पडली. त्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबरला अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये. दादरमध्ये अनेक रुग्ण सापडत असून अनुयायांनी बाहेरून मुंबईला येणे धोक्याचे आहे.त्याऐवजी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी, असे अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे रामदास आठवले म्हणाले. तसेच नवरात्रोत्सवानिमित्त जशी नियमावली तयार केली.तशीच महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियमावली तयार करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी सरकारला केली आहे.

Previous articleचीनचं राहू द्या,आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर काढून दाखवा!
Next articleएक जगह जब जमा हो तीनो.. अमर,अकबर,अँथनी!