चीनचं राहू द्या,आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर काढून दाखवा!

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेसचे सरकार असते तर १५ मिनिटात चीनला हाकलले असते, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींसकट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.चीनचे राहू द्या,तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे.आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा, असे आव्हान निलेश राणे राहुल गांधींना दिले आहे. ट्विटरवरून त्यांनी हा निशाण साधला आहे.

“राहुल गांधी म्हणतात, आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असते. चीनचे राहू द्या, तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे. आधी एक काम करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. “राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे. जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी रक्षामंत्री होते, तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण, ए के अँटनी यांनी हसत उत्तर दिले, “आमच्या चर्चा सुरू आहेत”. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हरियाणा येथील सभेत बोलताना राहुल गांधींनी चीनच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायर आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचे सरकार असते तर १५ मिनिटात चीनला हाकलले असते, असे राहुल गांधी म्हणाले होते. या मुद्याला धरून निलेश राणे यांनी राहुल गांधींना टोला लगावलाच. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कोरोनाकाळात मुख्यमंत्री घरूनच काम करत असून मातोश्री बाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधक वारंवार करत आहेत.

Previous articleवाचा : शाळा पुन्हा सुरु करण्याबाबतच्या संपूर्ण मार्गदर्शक सूचना
Next articleउद्धव ठाकरे, शरद पवारांनंतर आठवलेंची एकनाथ खडसेंना ‘ही’ ऑफर