मुंबई नगरी टीम
अमरावती : कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंदच आहेत.दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पंरतु दिवाळीनंतरही जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिला तर,विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता शाळा सुरू करणे शक्य होणार नाही, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी, राज्यात अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर कोरोना काळातील सर्व नियम पळून खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याचे संकेत बच्चू कडू यांनी आधीची दिले होते. सुरुवातीला ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जात होता. कोरोनाची परिस्थिती पाहता दिवाळीनंतर अधिक संक्रमण वाढले, तर शाळा बंद ठेवाव्या लागतील, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
जर कोरोनाचे संक्रमण आतापेक्षा कमी झाले व आपल्याला वाटले की, शाळा सुरू करायला हरकत नाही. त्यावेळी शाळा सुरू करता येतील. आपल्याला खबरदारीने पावले उचलायला हवीत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोवर राज्यातील महाविद्यालये सुरू करणार नाही, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आधीच घेतली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये इतक्यात तरी सुरू होणे कठीणच असल्याचे दिसत आहे.