मुख्यमंत्री फक्त वक्तव्ये करतात,कृती मात्र कुठे दिसत नाही : दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या संवादातून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांचा आजचा हा संवाद म्हणजे केवळ बोलाची कढी बोलाचा भात आहे, ते फक्त वक्तव्ये करतात,कृती मात्र कुठे दिसत नाही, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले की, मंदिर उघडण्याची मागणी होत असताना, एका बाजूला मदिरालये उघडली जात आहेत. पण सरकार मंदिरे उघणार नाहीत असे मुख्यमंत्री सांगत आहे, त्यामुळे यावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे बदलले वैचारिक स्वरुप राज्यातील जनतेसमोर आले आहे.लोकल सुरु करण्याची मागणी होत असताना, मला गर्दी नको, त्यामुळे लोकल ट्रेन सुरु करणार नाही असे मुख्यमंत्री सांगत आहे पण तुम्हाला काय हवे हे महत्त्वाचे नाही तर जनतेला काय हवे आहे याचा कधीतरी विचार करा. आपला संवाद हा नकरात्मक सांगण्यासाठीच असतो का ? काही तरी सकारात्मक गोष्टीची अपेक्षा आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

 लोकल ट्रेन सुरु होणे महत्त्वाचे आहे. कारण आज उपासमारीने नागरिक हैराण आहेत. उद्योगधंदे बंद पडलेत. कोरोनाने मरण्यापेक्षा उपासमारीने मरणार की काय अशी परिस्थीती आहे, त्यामुळे जीवनचक्र सुरु करण्यासाठी लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही, यावरुन जनतेच्याबाबतची त्यांची संवदेना दिसून येते अशी टिकाही दरेकर यांनी केली.शेतक-याला वा-यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात, परंतु आपण नुकताच मराठवाड्याचा दौरा केला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने पूर्णपणे मराठवाडातील शेतक-यांची शेती उध्दवस्त झाली आहे. अजूनही शेतक-याला कवडीची मदत नाही, पंचनामे झाले नाहीत. तो शेतकरी मदतीची वाट पाहत आहे, सरकारने त्याला वा-यावर सोडले आहे, अश्या स्थितीत केवळे शेतक-याला वा-यावर सोडले आहे असे बोलून चालत नाही. त्यामुळे केवळ बोलाची कढी व बोलाचाच भात यांच्या वक्तव्यावरुन दिसून येतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उक्तीपेक्षा  कृती करा असे आवाहनही दरेकर यांनी केले.

मेट्रो कारशेड आरेतून हलवली, आता कांजूरमार्गला हलविली. पण सारखे असे होत असताना प्रकल्पावर जो खर्च झाला आहे, त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल दरेकर यांनी केला. तसेच भांबावलेल्या अवस्थेत प्रकल्पाविषयी भूमिका घेऊ नका तर वस्तुस्थितीवर घ्या असे मतही त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री यांचा संवाद जनतेला अपेक्षाहिन वाटतो. काहीतरी दिलासा मिळेल या आशेने मुख्यमंत्र्याकडे जनता पाहत आहे. पण संवाद एकल्यावर जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास होतो आहे.मुख्यमंत्री म्हणतात की, कोविड काळात जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्हाला कळते. जर जबाबदारी तुमची आहे मग माझे कुटुंब माझी जबाबदारी असे सांगून ती जबाबदारी तुम्ही कुटुंबावर का सोडता, कारण सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे कधी बाजूने तर कधी विरोधात अशी संभ्रमावस्थेतील वक्तव्ये मुख्यमंत्र्यांची पाहायला मिळतात, त्यामुळे या संकटमय परिस्थितीत जनतेला काहीही दिलासा मिळत नाही अशी टिकाही दरेकर यांनी केली.

Previous articleअभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणांची अट शिथिल
Next articleदिवाळीनंतरही शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच ; खुद्द मंत्र्यांनीच दिली माहिती