महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

मुंबई नगरी टीम

अमरावती : काँग्रेसच्या आक्रमक नेत्या आणि राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिसांवर हात उगारणे चांगलेच महागात पडले आहे.या प्रकरणी न्यायालयाने त्यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे.हे प्रकरण आठ वर्षे जुने असून,जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. यशोमती यांना तीन महिने तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

आठ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.२४ मार्च २०१२ साली यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या अंबादेवी मंदिराजवळ पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली होती.तसेच पोलिसांवर हात उगारण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.या प्रकरणी अमरावती जिल्हा न्यायलयात सुनावणी पूर्ण झाली असून यशोमती ठाकूर यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत.त्यामुळे यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिवाय १५ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.

या प्रकरणात यशोमती ठाकूर यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळून आले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली.सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आदी कलमे यशोमती ठाकूर यांच्यावर लावण्यात आली होती. त्यानुसार त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Previous articleनाणार प्रकल्प जमीन खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी होणार
Next articleराज्यमंत्र्यांनी मंत्रालयाबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..!