मुंबई नगरी टीम
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाख खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याबाबत अधिकृतरित्या अद्याप घोषणा झालेली नसली तरी, चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार या वृत्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही आज अजित पवारांची भेट घेतली यावरही त्यांनी भाष्य केले.
आमदार शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली. या भेटीबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले शिवेंद्रराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. काहीजण मलाही भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणून काही काळेबेरे समजू नये. भाजपचे सरकार असताना आम्ही देखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो, मी तर सगळ्यांना भेटत असताे, असे अजित पवार यांनी म्हटले. तर गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असे वृत्त आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहीत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना देखील प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलणे टाळले. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी हा विषय टाळला. नाराज एकनाख खडसे लवकरच राष्ट्रवादीची वाट धरणार असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते पक्षप्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा आहे. परंतु याबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांनी काहीही बोलणे टाळले आहे. त्यामुळे घटस्थापनेला अवघे काही तास शिल्लक असून एकनाथ खडसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.