गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात 

मुंबई नगरी टीम

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या अज्ञाताला जामनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी गिरीश महाजन यांना देण्यात आली होती. याचा तपास करत पोलिसांनी अखेर एका व्यक्तीला अटक केली आहे. धमकी देणारी ही व्यक्ती पाचोरा एसटी डेपो येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील वृत्त एका माध्यमाने प्रसिद्ध केले आहे.

जामनेर येथील एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना एक निनावी फोन आला होता. यामध्ये गिरीश महाजन यांना एक कोटी देण्यास सांगा अन्यथा बॉम्बने उडवू, अशी धमकी यावेळी देण्यात आली. त्यानंतर धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने मेसेज करून सायंकाळी पाच वाजता स्फोट घडवून देण्याची पुन्हा धमकी दिली होती. धमकीच्या या फोनमुळे एकच खळबळ उडाल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
जामनेर पोलिसांनी दोन दिवसांतच धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने गिरीश महाजन यांना अशी धमकी का दिली याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेते आशिष शेलार यांनाही मंगळवारी धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली होती. आशिष शेलार यांना धमकीचे दहा फोन आले होते. फोन करणाऱ्या या अज्ञातांना पोलिसांनी मुंब्र्यातून अटक केली.

Previous articleएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर काय म्हणाले अजित पवार ?
Next articleमहिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी