मुंबई नगरी टीम
उस्मानाबाद : राज्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.हे अस्मानी संकट असून त्याचे परिणाम दीर्घकाळ होतील.शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.आज ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
याबाबत अधिक बोलताना शरद पवार म्हणाले, दीर्घ परिणाम करणारे हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद तुमच्यात आहे.जेव्हा शेतकऱ्यांची ताकद नसते,तेव्हा सरकारची ताकद उभी करावी लागते.ती आम्ही उभी करू.केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे,अशी मागणी यावेळी शरद पवारांनी केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या या भागात येणार असून त्यांच्याशी मी चर्चा करेन.लोकांना मदत केली पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. मदत करायची त्यांची तयारी देखील आहे.परंतु काही मर्यादा असून यासाठी केंद्राची मदत घ्यावी लागेल.त्यामुळे येत्या दहा दिवसांत पंतप्रधानांना भेटू व महाराष्ट्राला मदत केली पाहिजे असा आग्रह धरू,असे शरद पवार म्हणाले.
अतिवृष्टीमुळे राज्याच्या काही भागांत नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार आजपासून दोन दिवस उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील तुळजापूर-परंडा तालुक्यापासून केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर आलेल्या शरद पवारांनी शेतकऱ्यांची व्यथा यावेळी जाणून घेतली. कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान दौरा करताना शरद पवार यांनी आपली गाडी तीनदा थांबवत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवारांपुढे आपली समस्या मांडली. पावसामुळे वाया गेलेली पिके दाखवत शेतकऱ्यांनी आर्थिक मदत देण्याची मागणी शरद पवारांकडे केली. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली.