भगतसिंह कोश्यारींचे चुकलेच! राज्यपालांनी शब्द जपून वापरायला हवेत

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.पत्रात उपस्थित करण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापले असून,त्याचे पडसाद दिल्लीतही उमटले.गृहमंत्री अमित शहा यांनी याची दखल घेतली असून राज्यपालांच्या भूमिकेवर त्यांनी काहीशी नाराजी दर्शवली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी शब्द जपून वापरायला हवेत,असे अमित शहा यांनी म्हटले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र मी वाचले. या पत्रात कोश्यारी यांनी काही संदर्भ दिले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी शब्द जरा जपून वापरायला हवे होते. त्यांच्या शब्दांची निवड चुकली, असे अमित शहा म्हणाले.दरम्यान, राज्यपाल यांच्या या भूमिकेविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहत नाराजी व्यक्त केली होती.

राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारले होते. यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. “राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात?, असे म्हणत राज्यपालांनी थेट उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आलेले प्रत्युत्तर त्यावरून राज्यपाल आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक वाद रंगला होता.

Previous articleअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Next articleपक्षाला दगा देणाऱ्या नेत्यांची जागा लोकांनी त्यांना दाखवून दिली : रोहित पवार