मुंबई नगरी टीम
पुणे : “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत.भाजपचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य ते करणार नाहीत,असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.एकनाख खडसे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटलांकडून केला जात आहे.एकनाथ खडसे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत व ते पुन्हा उत्साहाने सहभागी होतील असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
स्वपक्षातील नेत्यांवर नाराज असलेले खडसे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.त्यांचा हा मोठा निर्णय म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार,अशी चर्चा आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची २२ ऑक्टोबर ही नवी तारीख देखील समोर आली आहे. त्यामुळे भाजपकडून हे नाराजी नाट्य संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.नाराज होणे,पुन्हा सामान्य होणे ही एक प्रक्रिया असते. एकनाथ खडसे यांच्याशी बोलणे सुरू असून ते पुन्ही उत्साहाने सहभागी होतील,असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. याआधी देखील चंद्रकांत पाटलांनी खडसे भाजप सोडून जाणार या अफवा असल्याचे म्हटले होते. परंतु एकनाथ खडसे यांची नाराजी लक्षात घेता ते पक्ष सोडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
घटस्थापनेनंतर एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची नवी तारीख समोर आली.येत्या २२ ऑक्टोबरला ते राष्ट्रवादीत अधिकृतरित्या प्रवेश करतील,अशी माहिती मिळाली आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता नाकारली आहे. देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद जिल्ह्याच्या दाै-यावर असताना माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हणाले, असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.