मुंबई नगरी टीम
उस्मानाबाद : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ही घोषणा केली.या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत.एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत,असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,ही खूप आनंदाची बातमी आहे.खडसेंचे महाविकास आघाडीच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चर्चा रंगली होती. पंरतु राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती. तर खडसेंनी देखील या वृत्ताचे खंडन केले होते.
आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी घोषणा केली. तत्पूर्वी खडसे समर्थकांकडून तसे वातावरण देखील तयार करण्यात आले. जळगावात खडसेंचे पोस्टर लावण्यात आले त्यावरून कमळचे चिन्ह गायब होते. तर काही राष्ट्रवादी प्रवेशाचे पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे खडसेंचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात होता. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जुन्या आणि पक्क्या राजकारणी नेत्याचा प्रवेश होत असून आता विरोधक असणाऱ्या भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.