आमचे आमदार खोके घेऊन गायब झालेत; शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंकडे मांडली व्यथा

मुंबई नगरी टीम

सांगोला । युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकरी संवाद यात्रा काढत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सांगोल्यात भर उन्हात शेतकऱ्यांशी शेताच्या बांधावर संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी स्थानिक आमदार शहाजी बापू पाटील यांच्याविषयीचा संताप आदित्य ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला.आमचे आमदार खोके घेऊन गायब झालेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

दरम्यान,आदित्य ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर चौक येथील शिवसेनेच्या देगांव शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले. तसेच, इथल्या शिवसैनिकांसोबत संवाद साधला. ग्रामीण भाग असो वा शहरी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना नेहमी प्रयत्नशील राहील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिला.आदित्य ठाकरे यांनी संगेवाडी येथील नुकसानग्रस्त सूर्यफूल पिकांची पाहणी केली. तसेच तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्यासोबत संवाद साधून येथील परिस्थितीचा अंदाज घेतला. यावेळी त्यांनी संगेवाडी येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला.

डाळिंबाची खाण असलेल्या सांगोला तालुक्यातील मांजरी गावातील शेतकऱ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला.शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे अनेक समस्या आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन, यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय माजी आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील रोटरी स्मृतीवनाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विधानसभेत सर्वाधिक ११ वेळा निवडून जाऊन आबांनी केलेली कामगिरी आणि निस्वार्थीपणे केलेली लोकसेवा समाजकारणातील प्रत्येकासाठी आदर्श वस्तूपाठ आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Previous articleथेट सरपंचपदांसह राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान
Next articleआम्ही लढणारे आहोत । ..तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया