मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अधिकृत याबाबत घोषणा केली. यावेळी जयंत पाटलांनी विविध भागातील दहा ते बारा भाजप नेत्यांशी चर्चा झाली असून त्यांची देखील पक्षात येण्याची इच्छा असल्याचे म्हणत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.तसेच एकनाथ खडसे यांच्यासह आणखी कोणकोण येणार याचा उलगडा हळूहळू होईल,असे सूचक विधान जयंत पाटलांनी केले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.खडसे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला धक्का बसल्याचे मानले जात असतानाच भाजपला आणखी धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.खडसेंच्या बरोबर भाजपाचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे.जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे अनेक नेते राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे संकट असल्याने विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर विधानसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागेल मात्र सध्याच्या काळात विधानसभेची पोटनिवडणूक घेणे परवडणार नाही त्यामुळे १० ते १२ आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार पुढील काळात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे.
भाजकडून हिरमोड झालेले आणि विकासाची अपेक्षा न उरलेले एकनाथ खडसेंसोबत येतील. खडसेंसह कोणकोण येणार याचा उलगडा हळूहळू होईल,आम्ही घाई करत नाही.यासह विविध भागातील अनेक भाजप नेत्यांशी चर्चा झाली.त्यांचीही राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे.याबाबात लवकरच समजले असे सांगत, एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नाही तर दिवसाढवळ्या होईल, असा चिमटाही जयंत पाटलांनी भाजपला काढला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न कुठेतरी तोकडे पडले असल्याचे बोलले जात आहे.