मुंबई नगरी टीम
उस्मानाबाद : राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये.सरकार चालवयाला दम लागतो,तो त्यांच्यात नाही. अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली होती.फडणवीस यांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युतर दिले आहे.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला.या भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पत्रकारांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संमाचार घेतला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये.सरकार चालवयाला दम लागतो,तो त्यांच्यात नाही.अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला.फडणवीस यांनी केलेल्या टीकेकडे कसं बघता,असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना करण्यात आला.त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,याकडे बघायला मला वेळच नाहीये.शेतकरी आणि जनता यांच्याकडे माझे लक्ष असल्यानंतर,हे चिल्लर थिल्लर,जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये,धीर धरावा.शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो आहे,त्यांना भेटलो आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ते करणार आहोत.नुकसान मोठे आहे.मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरु झाले आहे.पंचनामे जवळपास झाले आहेत.त्यामुळे नुसता विचार नाही पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत.दोन तीन दिवसांत यावर आपणास कळेल,विमा कंपन्यांशी देखील बोलून घेत आहोत.केंद्राकडून जीएसटीची थकबाकी देखील येणे बाकी आहे,तो परतावाही लवकर मिळणे गरजेचे आहे सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.