मुंबई नगरी टीम
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी घरीच स्वतःला क्वारंटाईन केले असल्याचे वृत्त काही माध्यमांत झळकले असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट करीत,पार्थ पवार यांनी अफवांचे खंडन केले आहे.अजित पवार यांना गेले तीन-चार दिवसांपासून अंगदुखी, ताप हे त्रास जाणवत आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व दौरे रद्द करत मुंबईतील घरात विश्रांती घेतली आहे.
आज सकाळपासूनच अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. तर तसे वृत्त देखील माध्यमांत प्रसिद्ध करण्यात आले होते.पंरतु अजित पवार यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे पार्थ यांनी सांगितले.एका वृत्तवाहिनीशी बोलताना पार्थ पवार यांनी माध्यमांत आलेल्या या वृत्तांचे खंडन केले. अजित पवार हे काही अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत,असे ट्वीट पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले होते.त्यामुळे अजित पवार यांच्या कोरोना चाचणीबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या.
अजित पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र सुदैवाने ती निगेटिव्ह आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. शनिवारी अजित पवारांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर या भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर बुधवारी त्यांनी दौरे रद्द केले होते. पंढरपूर येथील दौऱ्यानंतर त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. अंगदुखी आणि ताप असल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली. तर खबदारीचा उपाय म्हणून ते सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे अजित पवार व्हॅर्च्युअली बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.