भाजपचा एकही आमदार एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही : दरेकरांचा दावा

मुंबई नगरी टीम

सातारा : भाजपचा एकही आमदार एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. पक्षात असेपर्यंतच आमदार त्यांच्या संपर्कात होते,असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपचे १० ते १२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला.पंरतु या दाव्याला दरेकर यांनी छेद दिला आहे. साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला

यावर अधिक बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले,  खडसे हे कालपर्यंत  पक्षात होते त्यामुळे आमदार त्यांच्या संपर्कात होते. भाजपचे भवितव्य सर्वांना माहित आहे. भाजप हा दीर्घकाळ नेतृत्व करणारा एवढा मोठा पक्ष आहे. केंद्रात पंतप्रधान मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस कसे काम करत आहेत हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे इतर कोणता आमदार खडसेंसारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल, असा सवाल उपस्थित करत दरेकरांनी खडसेंचा दावा फेटाळला. यासह एकनाथ खडसे यांनी नैतिकची गोष्ट करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा दाखला दिलेला. त्यावरही बोलताना दरेकर म्हणाले, खडसे आता त्याचा राष्ट्रवादीत गेलेत ना, याबाबत फडणवीसांची बदनामी आम्ही भोगली आहे. शरद पवार हे खडसेंवर तोडपाणी करणारा नेता म्हणून आरोप करतच होते. त्यामुळे त्यांच्या पक्षात जाऊन खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करू नये. नांदा सौख्य भरे, अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी खडसेंवर टीकास्त्र डागले.

Previous articleअजित पवार कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; पार्थ यांच्याकडून त्या वृत्ताचे खंडन
Next article…तर गोरगरिबांकडून लसीचे पैसे घेणार का ? बाळासाहेब थोरातांचा भाजपला सवाल