मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील सदस्यांसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा असतानाच यावर आज शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. उर्मिला यांचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही,असे सांगतानाच विधानपरिषदेसाठी नावांची शिफारस राज्यपालांना पाठवू, त्यानंतर काय होते ते पाहू, असे म्हणत अनिल परब यांनी चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावर अधिक बोलताना ते म्हणाले, चव्हाट्यावर बसून चर्चा करायची ही नावे नाहीत. राज्य सरकार काळजीपूर्वक नावे देत आहेत. मंत्रिमंडळाने यासंदर्भात ठराव केला आहे, असे अनिल परब म्हणाले. यावेळी अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर देखील भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याला उत्तर देताना सोमय्या यांना एकच काम आहे. त्यांना भाजपही गंभीरपणे घेते नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सध्या भाजपने कशावरच राजकारण करू नये असेही ते म्हणाले.
कोरोना काळात एसटी तोट्यात आहे. एसटी सुरू ठेवणे सरकारचे कर्तव्य आहे. कामगारांचे पगार आणि एसटी सुरू ठेवण्यासाठी किमान खर्च यासाठी सरकारकडे ३६०० कोटी मागितले असल्याची माहिती यावेळी अनिल परब यांनी दिली. तसेच बाहेरून पैसे उभे करण्याचा प्रयत्नही परिवहन मंत्रालय करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांचे पगार थकले असून ९०० कोटी रुपये यासाठी आवश्यक आहेत. तर एकूण साडेपाच हजार कोटींचा तोटा एसटीला कोरोना काळात सहन करावा लागला, अशी माहिती त्यांनी दिली.