राज्यपालांच्या सल्ल्यानंतर राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन… म्हणाले !

मुंबई नगरी टीम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत वाढीव वीज बिले आणि युद्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा केली व तसे निवेदनही दिले. या भेटीदरम्यान राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी राज्यपालांचा शब्द पाळत शरद पवारांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरे यांचा फोन आल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनीच दिली आहे. राज ठाकरे यांचा फोन आला होता. मात्र आमच्यात भेटण्याबाबत काही ठरले नाही. मी बाहेरगावी जाणार आहे. त्यामुळे भेटीचे काही नियोजन नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. तर मला राज ठाकरे यांनी सांगितले की, राज्यपालांनी आपल्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली. राज्यपालांनी वाढीव वीज बिले आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांचा सल्ला राज ठाकरेंना सुचवला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ पत्रावरील नाराजीच राज्यपालांनी एकप्रकारे व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, वाढीव वीज बिलांचा मुद्दा हा मनसेने आधीपासूनच उचलून धरला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिष्टमंळाने राज्यपालांना निवेदन दिले. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावही राज ठाकरेंनी लक्ष वेधले. राज्यपाल भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या मुद्दयांवर आपली चर्चा झाली असल्याचे सांगितले. यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारकडे निर्णयाची कमतरता असल्याचे म्हणत सरकारच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. सरकारने रेस्टोरंट सुरु केले पण मंदिरे बंद आहेत, रस्त्यावर ट्राफिक आहे पण रेल्वे सुरू होत नाही.असे कुंथत कुंथत सरकार चालत नाही, असा सणसणीत टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

Previous articleनोकर भरतीवरून मंत्री विजय वडेट्टीवार संतप्त
Next articleउर्मिला मातोंडकरला विधानपरिषदेवर पाठविण्याबाबत शिवसेनेने घेतला ‘हा’ निर्णय