तेव्हाचे मुख्यमंत्री मला पंतप्रधान कार्यालयात घेवून गेले होते : केसरकरांचा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

सिंधुदूर्ग : माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज असल्याचे आज फेटाळून लावले.कोणाला मंत्री करायचे हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही असे स्पष्ट करतानाच,मला मंत्री व्हायचे असते तर त्याचवेळी भाजपमध्ये गेलो असतो.त्यावेळी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून बोलावण्यात आले होते.तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री मला घेऊन दिल्लीला गेले होते. आज ते नाहीत अन्यथा त्यांनी याबाबत सांगितले असते, असा गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला आहे.

फडणवीस सरकार मध्ये गृहराज्यमंत्रीपद ( ग्रामिण ) भूषविलेले शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराज आसल्याची चर्चा होती. मात्र केसरकर यांनी ही चर्चा स्पष्ट शब्दात फेटाळली आहे.मंत्री कोणाला करावे आणि कोणाला करू नये हा अधिकार पूर्णपणे पक्षप्रमुखांचा आहे.त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्ट करतानाच,मला मंत्री व्हायचे असते तर त्याचवेळी भाजपमध्ये गेलो असतो.मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून बोलावण्यात आले होते. तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री मला घेऊन दिल्लीला गेले होते. आज ते नाहीत अन्यथा त्यांनी याबाबत सांगितले असते,’ असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि शिवसेना आमदार केसरकर यांनी केला आहे.महाविकास आघाडीमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही याचे अजिबात दु:ख नाही. मात्र सिंधुदुर्गाचे मंत्रिपद गेल्याचे दु:ख आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.ते आज एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

माझे मंत्रिपद गेल्याचे दु:ख नाही. पण जिल्ह्याचे मंत्रिपद गेल्याचे दु:ख निश्चितच आहे.आमदार वैभव नाईक यांना मंत्री केले असते तरी चालले असते. मला मंत्री केले असते तर तीन वर्षांनंतर मी हे पद सोडून वैभव नाईक यांना दिले असते. तसे मी नाईक यांना बोललो होतो.मी मंत्रिपदाला चिकटणारा माणूस नाही.मला मंत्रिपद मिळावे यासाठी कोणालाही भेटलेलो नाही असे सांगतानाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याचे आम्हाला समाधान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleउर्मिला मातोंडकर यांच्यानंतर शिवसेनेकडून ‘या’ अभिनेत्याचे नाव चर्चेत
Next articleआजपासून कोल्हापूर जिल्ह्यात “फक्त एकच गट तो म्हणजे उद्धव गट”