कोकणातून शिवसेना हद्दपार करणार ; नारायण राणे गरजले

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार असा विश्वास सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केला जात असताना कोकणातून शिवसेना हद्दपार करण्याची रणनीती भाजप आखत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अकराही आमदार निवडून येणार नाहीत. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना हद्दपार करण्यात येईल,अशी गर्जनाच भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेविरोधात एल्गारच पुकारला.

भाजपचे खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारला खाली उतरवण्यासाठी आणि शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी भाजपने कार्यक्रम आखला आहे. केंद्राने लागू केलेली आत्मनिर्भर योजना व इतर विविध योजना जनतेपर्यंत पोहचवू. भाजप कशा पद्धतीने काम करत आहे आणि राज्यातील आताचे सरकार एकही काम न करता जनतेची कशी दिशाभूल करत आहे, याचे मार्गदर्शन केले असल्याचे राणे यांनी सांगितले.

कोकणातील शिवसेनेच्या अकराही आमदारांना आगामी निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असून त्यांना घरी बसवले जाईल. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या आमदारांची संख्या कमी होईल,असा दावा नारायण राणे यांनी केला.कोकणातील शिवसेनेचे आमदार विधानसभेत कोकणाच्या विकासासंदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाही.दरम्यान,कोकणासाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला नाही तरी,कोकणाचा विकास थांबवायचा नाही हे आम्ही ठरवले आहे. त्यासाठी भाजप आंदोलन करेल, असेही नारायण यांनी म्हटले. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या आठवड्यात कोकणचा दौरा केला. यावेळी त्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.सत्तार यांच्या या दौऱ्यावर राणे यांनी टीका केली.महसूलमंत्री काँग्रेसचा आणि राज्यमंत्री शिवसेनेचा, कोण विचारतंय ? सत्तार काहीही बोलतात.सत्तारांना मी गेल्या चाळीस वर्षांपासून ओळखतोय.ते अगोदर अशोक चव्हाण यांच्याबरोबर फिरायचे”, असा टोलाही राणे यांनी लगावला

Previous articleभाजप शासीत राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा उद्या चैत्यभूमीवर एल्गार
Next articleसेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड जाणार; मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय