मुंबई नगरी टीम
मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.या अगोदर आलेले सर्व सण आपण साधेपणाने साजरे केले.सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आपण थोडेसे तणावमुक्त आहोत,मात्र आपण काळजी घेणे गरजेचे आहे.दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणण्यापेक्षा आपणच त्यावर उपाय करणे गरजेचे आहे,असे सांगतानाच कांजूरमार्ग कार शेडवरून सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला.विरोधकांकडून ही मिठाघराची जमीन आहे असे सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे,असे टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी भाजपवर सोडले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.अर्धा तासाच्या या संवादात त्यांनी दिवाळी सण,कांजूरमार्ग कार शेड,कोरोनाची संभाव्य दुसरी लाट,विदेशी गुंतवणूक,मंदिरे कधी उघडणार आदी गोष्टींवर भाष्य केले.दिवाळीबाबत बोलताना ते म्हणाले की,फटाक्यांवर बंदी आणता येईल,मात्र फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा,असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले . गेल्या काही महिन्यापासून राज्यातील डॉक्टर्स आणि अन्य यंत्रणा यांच्यावर खूप ताण आहे असे सांगून,ते कुणासाठी करत आहेत,तुमच्यासाठीच ना ? असा सवाल त्यांनी केला.त्यामुळे आपली आजवरची मेहनत प्रदुषणामुळे व्यर्थ जायला नको असेही त्यांनी स्पष्ट केले.फटाक्यावर बंदी आणून मी तुमच्यावर आणीबाणी आणणार नाही प्रदुषणामुळे जर कोरोना रूग्णांचा आकडा वाढत असेल तर दिवाळीत फटाके फोडणे थांबवू शकतो का ? असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले.मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत.या सर्वांची उत्तरे आमच्याकडे आहे.त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ असे सांगतानाच,विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असे सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे असा टोला नाव न घेता त्यांनी भाजपला लगावला.कसल्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू.या प्रकल्पासाठी जर्मनीच्या बँकेकडून ४५ दशलक्ष युरोंचे माफक दरात कर्ज घेतले असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.आम्हाला महाराष्ट्र सोयीस्कर वाटतो असे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे राज्यातील जनतेच्या मेहनीचे फळ आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.जगभर,देशभर,राज्यवर संकट आले असताना महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीच जे कारस्थान केले होते ते मोडून तोडून आपण हजारो कोटींचे सामंजस्य करार केले,असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.देश-विदेशातील अनेक कंपन्यांना जागा दिल्या आहेत.३५ हजार करोडचे करार केले आहेत.मी घरात बसतो असे टीका करतात पण घरात बसून सुद्धा मी हे काम केले आहे.आम्हीं डोळे मिटुन कारभार करत नाही,असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला.
आपण हळू हळू सर्व बाबी उघडत आहोत.सिनेमागृहे,नाट्यगृहे,जिम,व्यायामशाळा, उद्योगधंदे आदी हळू हळू सुरू करत चाललो आहोत.मुख्यमंत्र्यांनी मंदिरे उघडण्यावरही यावेळी भाष्य केले.मंदिर कधी उघडणार ? असा सवाल करत माझ्यावर टीका केली जात आहे. पण तुमच्या हितासाठी,महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही टीका सहन करायला मी तयार आहे.टीका करणारे चार दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आले तर असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याचे संकेत दिले.दिवाळीनंतर मंदिरे,प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटता दिसत असला तरी अद्याप काळजी घेण्याची,ज्येष्ठांना जपण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल परंतू मी माझ्या महाराष्ट्राचे आणि माझ्या जनतेचे हित जपणारच ही ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते,आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही,मास्क लावणे,हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीचा सण प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदुषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा,सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आतू येऊ देऊ नये असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे असेही म्हटले आहे.कोरोना संकटकाळात राज्यातील सर्व धर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे.इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी धूर आणि प्रदुषणामुळे आतापर्यंत कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागून वाहून जाऊ शकते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले. दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की इटली, स्पेन,इंग्लंड, नेदरलँड सारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे.काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणु दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. कोरोनाशी लढतांना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत, आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धे ही आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक परिश्रम घेत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
लोकांचा पैसा लोकहितासाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी जून ते ऑक्टोबर या काळात ४१ लाख हेक्टर जमीन अतिवृष्टी, पुराने बाधित झाल्याचे सांगितले. यात मोठ्याप्रमाणात शेतपिकांचे नुकसान होतांना घरे पडली,जमीनी वाहून गेल्या. यासर्वांना मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही ते म्हणाले.कोरोना नियंत्रणात शासनासोबत राज्यातील जनतेला सहभागी करून घेण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात आल्याचे, यात ६० हजार टीम सहभागी होऊन त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.ते म्हणाले की या तपासणीमध्ये साडे तीन लाख आयएलआय व सारीचे रुग्ण आढळले. १३ लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जाणवले तर ८ लाख ६९ हजार ३७० लोकांना मधुमुह असल्याचे लक्षात आले. ७३ हजार लोकांना ह्दयरोग तर १८८४३ लोकांना कर्करोग असल्याची माहिती यातून मिळाली. १ लाख ६ हजाराहून अधिक लोकांना इतर आजार असल्याचे दिसून आले. या अभियानात ५१ हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. घरोघर जाऊन राज्यातील लोकांची आरोग्य तपासणी केल्यामुळे राज्याचा आरोग्य विषयक नकाशा यातून स्पष्ट झाला. वेळेत कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात सहभागी होऊन काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व महाराष्ट्र तुमचा ऋणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली
मास्क न वापरणे ही गोष्ट अजिबात चालवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण ४०० जणांना बाधित करू शकतो.ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी अनलॉक प्रक्रियेमध्ये राज्यात आपण सावधतेने पाऊल पुढे टाकत असल्याचे सांगतांना नियमावली निश्चित करून आतापर्यंत रेस्टॉरंट, नाट्य आणि सिनेमागृहे व्यायामशाळा, ग्रंथालये आदी बाबींना मान्यता दिल्याची माहिती दिली. दिवाळीनंतर नियमावलीच्या आधारे ९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महिलांसाठी लोकल प्रवासाला मान्यता देण्यात आली असून सर्वांसाठी लोकलची मान्यता देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु असून रेल्वेमंत्री पियुष गोयल चांगले सहकार्य करत असल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरु झाल्याचे सांगतांना उडीद, मुग, सोयाबीन, तूर यासारख्या इतर शेतपिकांची शासन खरेदी करणार असून येत्या महिनाभरात ही केंद्र सुरु करण्यात येतील अशी माहिती यावेळी दिली.फोर्सवन मधील सैनिकांना प्रोत्साहनभत्ता दिल्याचे, माजी सैनिकांसाठी निवासी मालमत्ता कर (घरपट्टी) माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. समाजातील कोणताच घटक वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी मराठा, धनगर तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात भाष्य केले.हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्काच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.