मुख्यमंत्र्यांचा आजचा संवाद म्हणजे “बोलाचीच कडी बोलाचाच भात”

मुंबई नगरी टीम

मुंबई :मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आजचा संवाद म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा फक्त भ्रमनिरास करणार होता.केवळ संवादातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.परंतु या संवादाने जनतेला कुठलीही भरीव गोष्ट मिळाली नाही.आजही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे,मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्याचे काय.नक्की सरकार यासंदर्भात काय करणार आहे. अतिवृष्टी व निसर्ग चक्रिवादळामुळे महाराष्ट्र उध्वस्त झाला आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची कोकणात मदत मिळाली नाही. महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न आहे.पण यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं नाही अशी टीकेची झोड विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

एसटी कर्मचारी रोज आंदोलन करत आहेत.चार महिने झाले तरीही त्यांचे पगार झालेले नाहीत. एसटी कर्मचारी रोज मरण यातना भोगतोय.या कामगारांची दिवाळी कशी गोड होणार,यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादातून दिले नाही.केवळ सामंजस्य करार करून चालणार नाहीत. त्या कराराची अंमलबजावणी जलद गतीने होताना दिसतं नाही. शहरातून ग्रामीण भागामध्ये जे चाकरमानी गेले, त्यांचं भविष्य काय? याचा विचारविनियम होताना दिसत नाही. तसेच याबाबत मुख्यमंत्री संवादात काहीही बोलले नाहीत असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी केवळ भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिराचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणतात की, ज्या देवाच्या दयेने हे सर्व करतोय तोचं देव आज बंदिस्त आहे. त्याला मोकळे करण्याची आवश्यकता आहे परंतु त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच भाष्य केलं नाही. त्यामुळे त्यांचा संवाद हा केवळ ‘बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात’ आहे, असं म्हणावं लागेल असेही दरेकर यांनी सांगितले.महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यामधील एका महिलेचे डोळे नराधमांनी फोडले आहे, त्यावर मुख्यमंत्र्याचे भाष्य नाही. राज्यातील सर्वांगिण परिस्थितीतवर भाष्य करण्याची आवश्यकता होती, पण सरकार म्हणून यावर काय उपाययोजना करणार आहोत यावर भाष्य नाही. विनाअनुदानित शिक्षक पगारापासून वंचित आहेत, कोविडच्या डॉक्टरांनाही पगार मिळत नाही अश्या जिव्हाळ्याच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलेले नाही. केवळ भावनिक वातावरण करित सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न व कोरोनाच्या बाबतीत पुन्हा केवळ फक्त बोलणे अश्या प्रकारे मुख्यमंत्र्याचां आजचा संवाद म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात अश्याच प्रकारचा होता असेही दरेकर यांनी नमुद केले आहे.

Previous articleकेंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंची कोरोनावर मात;कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत
Next articleम्हणून पवार कुटुंबांने रद्द केला बारामतीत होणारा दिवाळी सोहळा