माझ्या वक्तव्याचा विपर्यास, खडसेंकडून ‘त्या’ वक्तव्यवाबद्दल दिलगिरी व्यक्त

मुंबई नगरी टीम

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ब्राम्हण समाजाचा उल्लेख केल्यानंतर मोठा वादंग उठला होता.ब्राम्हण महासंघाने आक्रमक भूमिका घेत खडसेंकडून माफीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आज आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून आपण सर्वच समाजाचा आदर करतो,असेही खडसेंनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. “दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असे ट्वीट खडसेंनी केले आहे. खडसेंच्या या माफीनाम्यामुळे सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ब्राम्हण समाजाचा उल्लेख केला होता. यावरून आता ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला आहे. खडसेंनी आपले व्यक्तव्य मागे घेतले नाही तर त्यांचा पुण्यात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली होती. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसला पदवीधर निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील,असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशीच टीका करताना खडसेंनी ब्राम्हण समाजाचा उल्लेख त्यात केला होता. यावर ब्राम्हण महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे. दान करण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, याचे ज्ञान खडसे यांना नसणे याचे आश्चर्य वाटते.एकनाथ खडसे यांनी केलेले व्यक्तव्य त्वरित मागे घ्यावे.अन्यथा पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही. पुण्यात आल्यावर त्यांना जाब विचारण्यात येईल, असा इशाराही आनंद दवे यांनी दिला होता.

मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, मी भल्याभाल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असे समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेले हे पद मी ब्राम्हणाला दान म्हणून दिले. या विधानावर ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला होता. एकनाथ खडसे यांनी आपले विधान मागे घेत माफी मागावी. अन्यथा पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा महासंघाने दिला होता.

Previous articleपदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा
Next articleअर्णबची काळजी सरकार घेतंय,राज्यपालांनी चिंता करू नये : भुजबळांची कोपरखळी