अखेर योगगुरु बाबा रामदेव नरमले ! ‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबाबत मागितली माफी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राम किसन यादव उर्फ योगगुरु बाबा रामदेव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते.त्यांच्या या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.याबाबतीत बाबा रामदेव यांनी खुलासा करीत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.

ठाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राम किसन यादव उर्फ योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.या कार्यक्रमावेळी त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांही उपस्थित होत्या.बाबा रामदेव यांच्या या विधाननंतर शिवसेनेसह राष्ट्रवादीने त्यांचावर निशाणा साधत माफी मागण्याची मागणी केली होती.बाबा रामदेव यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस देत दोन दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती.या नोटीशीनंतर बाबा रामदेव यांनी राज्य महिला आयोगाला खुलासा पाठवला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे.राज्य महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देताना बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ नुसार आपण कोणताही गुन्हा केलेला नाही.आपण नेहमी विश्वस्तरावर महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न केले आहे.कारण महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळावा. आपण आत्तापर्यंत भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळावा म्हणून विविध संघटनांसोबत मिळून काम केले आहे.

माझा कोणत्याही महिलेचा आपमान करण्याचा हेतू नव्हता.ठाणे येथील कार्यक्रम हा महिला सशक्तीकरणाचा होता.कार्यक्रमात मी बोललेल्या काही सेकंदाचा व्हिडीओ समाज माध्यमावर अधोरेखित केला गेला. माझ्या म्हणण्याचा गैरअर्थ काढण्यात आला.मी माझ्या संपूर्ण भाषणात मातृशक्तीचा गौरव केला.मी कपड्यांबद्दल केलेल्या विधानाचे अर्थ माझ्यासारख्या साध्या कपड्यात असे होते.तरी देखील माझ्या त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याचा खेद आहे.माझ्या बोलण्याने दुखावलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो,असे या खुलाश्यात बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

Previous articleमहिनाभरात स्मारकाचा प्रश्न निकाली निघाला नाही तर कुटुंबियांसह सत्याग्रह आंदोलनात सहभागी होणार
Next articleराज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार का ? राजभवनाकडून करण्यात आला मोठा खुलासा