पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही,दिशाभूल केल्यास कारवाई करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्या नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

रामदेव बाबा यांच्या कोरोनावरील औषधावर राज्य सरकारने यापूर्वीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजली ने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे.प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव(कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिराती मुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे.कोरोनील चा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

Previous articleमुंबईतील कमी चाचण्यांकडे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा वेधले लक्ष
Next articleपंतप्रधान युध्दभूमीवर पोहचले,पण मुख्यमंत्री कोकणात देखील जाऊ शकले नाहीत !