जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेणार का ? उद्या होणार फैसला ; निर्णय न झाल्याने विरोधकांचा सभात्याग

मुंबई नगरी टीम

नागपूर । विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याने हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांच्यावरील निलंबन कारवाई मागे घ्यावी,अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घ्यावा असा आग्रह पवार यांनी यावेळी धरला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत असल्याने ते परत आल्यावर त्यांच्याशी चर्चा करून यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.मात्र त्याच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने संतप्त विरोधी सदस्यांनी सरकारचा धिक्कार करीत सभात्याग केला.

गेल्या आठवड्यात विधानसभेत सत्तारूढ पक्षाच्या अनेक सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली,मात्र शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधव यांना संधी मिळाली नसल्याने त्यांना बोलण्याची संधी द्यावी असा आग्रह जयंत पाटील यांनी धरला होता. त्यांची विनंती अध्यक्षांनी मान्य केली नाही त्यामुळे जयंत पाटील संतप्त झाले होते.त्या भरात त्यांचा तोंडातून काही आक्षेपार्ह विधान निघाले.तेव्हा संपूर्ण सभागृह अवाक झाले. सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली. ती अध्यक्षांनी मान्य केली. जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत विधीमंडळ आवारात येण्यास प्रतिबंध असल्याचे जाहीर केले आता त्यांना कठोर शिक्षा न देता त्यांचे निलंबन आजच मागे घ्यावे अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.मुख्यमंत्री शिंदे हे केंद्राच्या विनंतीवरून दिल्लीतील कार्यक्रमाला गेले आहेत.ते परत येताच त्यांच्याशी चर्चा करून यावर निर्णय घेवून असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.मात्र त्यांच्या या उत्तराने विरोधी पक्षाच्या सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला.

Previous articleमहाराष्ट्राच्या अभिमान,स्वाभिमान,अस्मितेला धक्का; कर्नाटकला ‘जशास तसे’ उत्तर द्या
Next articleमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत ; सत्तार यांची मंत्रीपदावरून हाकालपट्टी करा