मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कामकाजाला सुरूवात केली आहे.ते आज मंत्रालयातही दाखल झाले.खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत अजित पवार यांच्या या ॲक्टीव्ह मोडला टिपले आहे.यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरता अजित पवार यांच्या खुर्ची भोवती एक चौकट आखल्याचे लाईव्हमध्ये दिसून येत आहे. कोरोना काळात याधीही अजित पवार अशाच प्रकारे आपल्या कार्यालयात खबरदारी घेताना पाहायला मिळाले होते.
खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच सोशल मिडियावर ॲक्टीव्ह असतात. मग ते जनतेची काम असो वा कोणा सामान्य व्यक्तीची घेतलेली भेट असो, सुप्रिया सुळे याबाबत सोशल मीडियावरून माहिती देताना दिसतात.यावेळी त्या एका कामासाठी अजित पवार यांच्या कार्यालयात गेल्या असता त्यांनी हा क्षण फेसबुक लाईव्हद्वारे लोकांसमोर आणला.यात उपमुख्यमंत्री अजित पवार काही फाइलींवर सह्या करताना दिसले. दरम्यान, २ नोव्हेंबरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अजित पवार हे एक आठवडा विश्रांती घेणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले होते.त्यानुसार बरोबर आठवड्यानंतर अजित पवारांनी कामकाजाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
सुरुवातीला थकवा जाणवत असल्याने अजित पवार हे होम क्वारंटाईन होते. त्यावेळी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला होता. मात्र दुसऱ्यांदा चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर २६ ऑक्टोबरला त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आठवडाभर उपचार घेतल्यानंतर २ नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनीच आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे ही माहिती दिली होती.