मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनेकांनी आदरांजली वाहिली.अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे.तर त्यांचे मराठी माणसाचे पाऊल पुढे नेण्याचे दुसरे स्वप्नही लवकरच पूर्ण करू,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
स्मृतिस्थळावर दर्शन घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दरवर्षीप्रमाणे आदरांजली अर्पण करण्यासाठी आलो आहे. मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न यावर्षी नियतीने, जनतेने पूर्ण केलेले आहे. त्यामुळे यावेळेस बाळासाहेबांची आठवण होणे हे एका वेगळ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी नियतीने आमच्या खांद्यावर टाकली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्याची प्रतिज्ञा आम्ही इथे येऊन करत आहोत.
मंत्रालयावर भगवा फडकवणे,शिवसैनिकला मुख्यमंत्री करणे केवळ हेच बाळासाहेबांचे स्वप्न नव्हते.तर महाराष्ट्राचे आणि प्रत्येक मराठी माणसाचे पाऊल पुढे पडले पाहिजे. त्यांचे हे दुसरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू”, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्थळावर गेले होते. याशिवाय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदर संजय राऊत, नेते रामदास कदम यांनीही आदरांजली वाहिली.