मुंबई नगरी टीम
मुंबई : दिवाळीनंतर राज्यातील वाढलेल्या कोरोना रूग्ण संख्येमुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत वेळीच सावध राहण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका,असे सांगतानाच कोरोनाची पुढील लाट ही आधीच्या लाटेपेक्षा भयंकर असण्याची शक्यता व्यक्त केली.जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आणि मास्क वापरण्याबाबत कळकळीचे आवाहन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.त्यांनी यावेळी भाविकांना कार्तिकी वारीला गर्दी न करता साधेपणाने पार पाडण्याचे आवाहन केले. दिल्ली आणि अहमदाबाद मध्ये वाढलेल्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची पुढील लाट ही आधीच्या लाटेपेक्षा भयंकर असण्याची शक्यताही व्यक्त केली.राज्यातील काही नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट,मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, मंदिरातील गर्दी, शाळा पुन्हा सुरु करणे, लॉकडाऊन यांसह अनेक विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे भाष्य केले.राज्यात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडली आहेत.आता कार्तिकी वारी येत आहे.कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा.गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचे संकट टळलेले नाही असेही आवाहन त्यांनी केले. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते असे सांगतानाच कोरोनाची लस केव्हा येणार आहे हे अधांतरी असले तरी हात धुवा,सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्री पाळावी लागणार आहे असेही त्यांनी सांगितले.
मी तुमच्यावर नाराज आहे कारण अजूनही अनेक लोक मास्क न घालता फिरत आहे.गर्दी करत आहेत.आपण शाळा उघडण्याचा निर्णय घेतला पण शाळा उघडू शकलो नाही.उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे.काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का ? असाही सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केला.दिल्लीत दुस-या लाटेनंतर तिसरी लाट आली आहे.परदेशात लॉकडाऊन करण्यात आला.सगळ उघडले म्हणजे करोना गेला असे समजू नका असेही ते म्हणाले.अनावश्यक घराबाहेर पडू नका, करोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा.लसी येईल तेव्हा येईल करोनापासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा.गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी टाळा, मास्क लावण विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा हेच करोना टाळण्याचे उपाय आहेत असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.