मुंबई नगरी टीम
मुंबई : कोणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांच्या तोंडून अशी भाषा शोभत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आडवे करण्याची शिवसेनेची भाषा ही पहिल्यापासूनच असल्याचे स्पष्टीकरण देत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ती शुक्रवारी प्रदर्शित झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना ठाकरी भाषेत चांगलेच फटकारले. कोणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी शिवसेनेची ही भाषा पहिल्यापासूनच असल्याचे म्हटले. राजकारणात प्रत्यक्षात कोण कोणाला आडवे करत नाही, हा सांकेतिक शब्द आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावल्यानंतर विरोधकांनी पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल चढवला.
ठाकरे सरकार लवकरच पडणारे, असे दावे करणाऱ्या भाजप नेत्यांनाही छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. एका पक्षाचे सरकार असले तरी कुरबुर होतेच, हे तर तीन पक्षाचे सरकार आहे. भाजपमध्येही कुरबुर चालूच असतात ना? कोरोनामुळे कोणी कोणाला भेटत नाही. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आम्ही भेट असतो, असे त्यांनी सांगितले. विरोधक आपल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी त्यांना लॉलीपॉप देतात. मात्र आमचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार. त्यानंतर सर्व निवडणुका एकत्र लढू आमचे सरकार रिपीट होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.