मुंबई नगरी टीम
जालना : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेच्या वाटेवर असून मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे विरोधक आता उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशावरून टीका टिप्पणी करताना दिसत आहेत.भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी उर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देत शिवसेनेला टोला लगावला आहे. जालन्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार, असे ऐकले आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. मातोंडकर यांनी आधी काँग्रेसकडून नशीब आजमावले, मात्र त्यांना अपयश आले होते. आता त्यांचे नशीब बदलते की शिवसेनेचे नशीब बदलते हे बघू, असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे. यावेळी प्रीतम मुंडे यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवरूनही त्यांना घेरले. महाविकास आघाडी सरकारला एकवर्ष पूर्ण झाले. या काळात सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला अपयश आले. राज्यातील समस्या आणि सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणे आमचे कर्तव्य आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली.
महाविकास आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळाली नाही, महिला सुरक्षेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. कोरोनाच्या संकटात उपाययोजना करण्याच्या बाबतीत देखील सरकार निष्क्रिय ठरले, असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या. राज्य सरकारने फक्त बदल्या आणि नवीन गाड्या घेण्याचा काम केले आहे. आमच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना अनेक माध्यमातून मदत दिली. आमच्यासोबत असताना शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत मागणाऱ्यांना आज स्वतःचे सरकार असताना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.