मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधक म्हणून भाजप सोडताना दिसत नाही. प्रामुख्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या वैयक्तिक आरोपांमुळे विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये जुंपली होती. भाजपकडून होणा-या या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी अखेर मौन सोडले आहे.
गेल्या वर्षभरात विरोधकांकडून तुमच्यावर अनेक आरोप झाले, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले,कामावर संपूर्ण लक्ष असल्याने विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे जास्त योग्य असल्याचा विचार केला. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असून त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाही, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले.मात्र आम्ही पाच वर्ष काम करू, राजकारण नाही, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली.
आपल्यावर झालेल्या वैयक्तिक हल्लाविषयी बोलताना आदित्य ठाकरेंनी यावेळी फुटबॉल खेळाचे उदाहरण दिले आहे. फुटबॉल पाहिले असेल तर त्यात मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते. त्यांनी गोल करू नये म्हणून घेरण्यात आलेले असते. त्यामुळे कदाचित त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल,असे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई पोलिस ते बॉलिवूडपर्यंत झालेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, आपली सत्ता असेपर्यंत विरोधकांना सर्व व्यवस्थित वाटत होते. मात्र जेव्हापासून सरकार गेले तेव्हापासून त्यांना बॉलिवूड आणि मुंबईचे लोक वाईट वाटू लागले.त्यांच्या पोटात दुखत असल्याने ते आरोप करत आहेत,अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.