पंकजाताई…तुला काहीही होणार नाही,मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे

मुंबई नगरी टीम

मुंबई : पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे,तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे अशी भावनिक साद राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना घातली आहे.

मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे.अशी पोस्ट पंकजा मुंडे यांनी समाज माध्यमातून केल्या नंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना फोन करून तब्येतीची विचारपुस केली आहे.जून महिन्यात धनंजय मुंडे हे कोरोना विषाणूचा सामना करून, त्यावर मात करून परत आले. या आजारात होणारा त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना दिला.

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलाटेड आहेत. पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोन वरून दिला आहे, तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Previous articleमी शिवसैनिक,शिवसैनिक म्हणून काम करणार : उर्मिला मातोंडकर
Next articleतलाठी भरतीचा मार्ग मोकळा; इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणार