मी शिवसैनिक,शिवसैनिक म्हणून काम करणार : उर्मिला मातोंडकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उर्मिला मातोंडकर यांनी शिवबंधन बांधून घेतले. आपल्या नव्या राजकीय वाटचालीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.कोरोना सारख्या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या कठीण काळात पक्षाने केलेल्या या कामामुळे आपण प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी दिली आहे. तसेच मी शिवसैनिक म्हणून आली आहे,शिवसैनिक म्हणूनच काम करणार, असेही त्या म्हणाल्या.

मी बॉलिवूडमध्ये आले तेव्हा सामान्य मराठी घरातील मुलगी होते, आताही आहे. मी ‘मीडिया मेड’ स्टार नव्हे तर ‘पीपल मेड’ स्टार आहे. त्याचप्रमाणे मला ‘पीपल मेड’ लीडर व्हायला आवडेल, अशी इच्छा उर्मिला यांनी व्यक्त केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कोणती नवी जबाबदारी मिळणार यावर विचारले असता, त्या म्हणाल्या की, मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेन. पक्ष जी जबाबदारी देईल तेव्हा देईल. विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे माझे नाव सुचवले आहे. त्यामुळे माझ्यावर पक्षप्रवेशाची कोणतीही सक्ती नव्हती. मला काम करण्याची इच्छा असल्याने मी शिवसेनेत प्रवेश केला, असे स्पष्टीकरण उर्मिला मातोंडकर यांनी दिले आहे.

पक्षप्रवेशा आधी उद्धव ठाकरेंचा फोन

शिवसेनेत प्रवेश करण्याआधी तुम्हाला कोणी अप्रोच केला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत आपण पक्षप्रवेश करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आपल्याला फोन आला होता, असे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळे विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या जागा आणि भवनांपर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे याचा दर्जा कुठेतरी वाढवला गेला पाहिजे. त्याकरता तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे. उद्धव ठाकरेंचे हे विचार मला खूप आवडले. विधान परिषदेसारख्या जागांवर त्यांनी माझा विचार केला, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.

काँग्रेसविषयी मनात कटुता नाही

काही कारणांमुळे १४ महिन्यापूर्वी मी काँग्रेस पक्ष सोडला. याचा अर्थ काँग्रेसबद्दल मनात कटुता आहे असे नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविषयी मला आदर आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उत्तम नेते आहेत. त्यामुळे काँग्रेसविषयी कोणताही वाईट हेतू नाही. यासह विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातून काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावावर बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांना काँग्रेसबद्दल कुठलीही तक्रार नाही. तसेच कुठल्या पदाचाही मुद्दा नव्हता. माझ्या वेगळ्या कारणांमुळे मी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला, असे त्यांनी सांगितले.

मी जन्माने आणि कर्माने हिंदू

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांना त्यांच्या हिंदुत्वाविषयी भूमिकेबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, मी जरूर सेक्युलर आहे. पण सेक्युलर असणे म्हणजे इतर धर्मांचा द्वेष करणे, असे नाही. किंवा हिंदू असणे म्हणजेच आपलाच धर्म पुढे रेटने असेही नाही. सेक्युलर असले तरी मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. माझा हिंदू धर्माचा अभ्यास आहे. त्याविषयी मी खूप बोलू शकते, असे सांगतानाच ज्या ठिकाणी माझ्या धर्माचा प्रश्न येतो त्यावेळी मला माझ्या धमार्ची बाजू घेऊनच बोलावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिलांचे प्रश्न आणि तत्सम विषयांवर काम करण्याची इच्छ

शिवसेनेची महिला आघाडी अत्यंत भक्कम आहे. या आघाडीचा एक भाग होता, आले याचा आनंदच आहे, अशी भावना उर्मिला यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महिला सुरक्षा आणि तत्सम विषयांवर काम करायला आवडेल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषदेची आमदारकी घोषित होईल तेव्हा मी हा विषय मांडेन जमिनीवर उतरून काम करण्याची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या.

Previous articleराणे नेमके कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले ? सुप्रिया सुळेंचा प्रतिप्रश्न
Next articleपंकजाताई…तुला काहीही होणार नाही,मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे