मुंबई नगरी टीम
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील ११०० कोटीचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे असल्याचा दावाही खडसेंनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात भाजप नेते गिरीश महाजन यांचे नाव देखील चर्चेत आले होते. त्यावर आता गिरीश महाजन यांनी पहिलीच प्रतिक्रिया देत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच राजकीय कारणासाठी माझ्यावर आरोप केले जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही. सुनील झंवर हा माझा खूप पूर्वीपासूनचा मित्र आहे. त्यामुळे मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. या घोटाळ्या प्रकरणी चौकशी व्हावी. यामध्ये माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असेल तर योग्य ती कारवाई व्हावी. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले. केवळ राजकीय कारणासाठी आपल्यावर आरोप होत असल्याचे म्हणत त्यांनी खडसेंना एकप्रकारे अप्रत्यक्ष टोला लगावला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांनी बीएचआर घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावे असून त्यांची यादीच तयार केली आहे. ईडीने यावर कारवाई करावी असे म्हणत त्यांनी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली होती. खडसेंच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून याप्रकरणी ते पुढे कोणती भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.