शरद पवार, अजितदादा, धनंजय मुंडे संजय राऊतांच्या भेटीला,’ही’ आहे इनसाईड स्टोरी

मुंबई नगरी टीम

मुंबई : महविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाली की राजकीय चर्चांणा उधाण येणे काही नवखे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर अशीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. खरे तर ही भेट संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असे बोलले जात आहे. मात्र या भेटीला आणखी एक महत्त्व असे की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या हालचाली विषयी विधान केले होते. त्यामुळे या भेटीवरून तर्क-वितर्क काढले जात आहेत.

संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि इतरही नेते मंडळी देखील उपस्थित होती. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाली. यावेळी शरद पवारांनी शेतकरी आंदोलनाविषयी आपली भूमिका मांडली. तसेच केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला होता.

राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा खेळ पुन्हा सुरू होणार आहे. भाजप सरकार पाडण्याचा कट रचत असून महाराष्ट्रातही याबाबत हालचाली सुरू असल्याचे अशोक गेहलोत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले होते. त्यामुळे शरद पवारांनी आज संजय राऊत यांची घेतलेली ही धावती भेट चर्चेचा विषय ठरली आहे. राजस्थानमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीचा साक्षीदार संपूर्ण देश आहे. त्यानंतर आता पुन्हा राजस्थामध्ये सत्तानाट्य रंगण्याचे संकेत गेहलोत यांनी दिले आहे. शिवाय महाराष्ट्राचाही उल्लेख त्यांनी केल्याने सत्ताधाऱ्यांचे कान टवकारले आहेत.

Previous articleशहाणपणाची भूमिका घ्या, शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला
Next articleकेंद्राने केलेल्या कायद्यात बदल केला जाईल, मात्र रद्द होणार नाही