शहाणपणाची भूमिका घ्या, शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले नवे कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात शनिवारी पार पडलेल्या पाचव्या बैठकीत देखील काहीच तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने लवकरच यावर तोडगा न काढल्यास हे आंदोलन केवळ दिल्ली पुरता सीमित राहणार नाही. त्यामुळे सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

शरद पवार हे रविवारी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमिवर अभिवादनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादात शरद पवारांनी शेतकरी आंदोलनावर चिंता व्यक्त केली. संपूर्ण देशाची शेती आणि अन्न पुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान त्यात पंजाब व हरयाणातील शेतक-यांचे आहे. प्रामुख्याने तांदुळ आणि गहू यांचे उत्पादन या शेतकऱ्यांनी देशाला पुरवले. तसेच जगातील १७-१८ देशांना धान्य पुरवण्याचे काम आपला देश करतो. त्यातही पंजाब, हरयाणाचा फार मोठा वाटा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

इथला शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे होते. मात्र दुर्देवाने तसे झाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जर हे असेच सूरू राहिले, तर ते दिल्लीपुरताच सीमित राहणार नाही. देशातील लोक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवूण घेतील. त्यामुळे अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशी आपली अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी सांगत केंद्राला हा सल्ला दिला आहे. दरम्यान, ९ डिसेंबरला शेतकरी प्रतिनिधी आणि केंद्राची सहावी बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleशेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा;मुख्यमंत्री दिल्लीतील बैठकीला हजेरी लावणार
Next articleशरद पवार, अजितदादा, धनंजय मुंडे संजय राऊतांच्या भेटीला,’ही’ आहे इनसाईड स्टोरी