मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : शरद पवार महाराष्ट्राची शान आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यामुळे जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे युपीएच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार अशी चर्चा होती. त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून नवनीत राणा यांनीही आपले मत व्यक्त केले.
आमचे शरद पवार हे महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल तर ते केवळ शरद पवारच करू शकतात. सर्व काही शक्य आहे, ते सगळ्यात वरिष्ठ नेते आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यामुळे जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, असे नवनीत राणा म्हणाल्या. दरम्यान, युपीए अध्यक्षपदाच्या चर्चेत काही तथ्य नसल्याचे स्वतः शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवार यांच्याकडे युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. शरद पवार यांना युपीएचा अध्यक्ष करण्याची चर्चा म्हणजे काँग्रेस संपवण्याचे एक मोठे कारस्थान असल्याचा दावा, संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच दिल्लीपासुन ते मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्याविरोधात मोहीम चालवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे संजय निरुपम यांच्या या दाव्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात नवी खलबते सुरू असल्याचे दिसत आहे.