मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला एका मागून एक धक्के दिले जात आहेत.राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले आमदार लवकरच घरवापसी करणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. येत्या चार महिन्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.त्याला दुजोरा देत नवाब मलिक यांनी लवकरच भाजपमध्ये गेलेल्या आमदारांचे राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांची बुधवारी यशवंतराव चव्हाण बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलवण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हे महत्त्वाचे विधान केले. “भाजपचे आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दिले. निश्चितपणे आगामी काळात भाजपचे आमदार जे राष्ट्रवादी सोडून गेले होते. काही सहा वर्षापूर्वी तर काही दीड वर्षापूर्वी गेले होते. त्यातील काही लोकांच्या इनकमिंगला आता सुरुवात होणार आहे”, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. यावेळी दौंड तालुक्यातील भाजप आणि रासपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रावादीमध्ये प्रवेश केला.
दरम्यान,आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक, राजेश टोपे यांसह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. अजित पवार यांनी बैठकीचे नेतृत्व केले. उमेदवारांना मिळालेली कमी मते, पराभवाची कारणे, मतदारसंघातील पक्षाची स्थिती आदींवर चर्चा झाली. पराभूत झालेल्या उमेदवारांवर पक्ष दुर्लक्ष करत असल्याची भावना असल्याने काहींमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे येत्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती रोखण्यासाठी पराभूत उमेदवारांना आजच्या बैठकीतून बळ देण्याचा प्रयत्न होता असे बोलले जात आहे.