मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा गोंधळ; नंतर कामकाजाला दांडी मारत मोर्चाला हजेरी

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी घोषणा देऊन नवाब मलिक यांच्या राजीनामाची जोरदार मागणी केली.सभागृहात झालेल्या गोंधळामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेचे कामकाज ३० मिनिटांसाठी तहकूब केले.

आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.सध्या नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचे राजीनामा देण्यासाठी आम्ही सभागृहात वारंवार मागणी केली आहे.सध्या ते कारागृहात आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ संमत करून त्यांना मंत्रिमंडळातून काढावे.सरकार त्यांचा राजीनामा न घेता नवाब मलिक यांना पाठीशी घालत आहे.मलिक यांच्या पाठीशी रहाणे म्हणजे आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊदच्या पाठीशी सरकार उभे रहात आहे,असा विचार समाजात जाईल.त्यामुळे सरकारने मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मागणी फेटाळून लावली.त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या आमदारांनी या मागणीचा पुनरुच्चार करत विधानसभेत पुन्हा घोषणा देऊन गदारोळ घातला.गोंधळामुळे उपाध्यक्ष झिरवळ यांनी सभगृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब केले.

कामकाजाला पुन्हा सुरूवात होताच मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता होती.कामकाजाला सुरूवात झाली मात्र सभागृहात भाजपचे एकही आमदार उपस्थित नव्हते.मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्यावतीने मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला होता.त्यासाठी भाजपचे सर्व आमदार मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी गेल्याने सभागृहात भाजपचे आमदार उपस्थित नव्हते.त्यामुळे लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात येवून,काही महत्वाची विधेयके मंजूर करण्यात आली.

Previous articleमहाभयंकर कट असल्याने देवेंद्र फडणवीस आणि सरकारी वकिलांची सुरक्षा वाढवा
Next articleराज्यपालांनी आतातरी अध्यक्ष निवडणूक आणि १२ आमदारांच्या प्रश्नावर निर्णय घ्यावा