मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपचे आमदार आणि माजदी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे.आमच्या नेत्यावर टिका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या,स्वत: विश्वासघातकी भूमिका घेता आणि कुठल्या तोंडाने आमच्यावर टिका करत आहात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
सांगलीत आज किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी पवार यांच्यावर टीका केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी,शरद पवारांचे मनावर घेऊ नका,ते नेहमी उलटे बोलतात.इतके खोटे बोलू नका नाही तर इतिहास लिहिला जाईल की तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर विश्वासघातकी राजे होतात,अशी टीका खोत यांनी केली.खोत यांच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.मंत्रीपदासाठी राजू शेट्टी यांचा विश्वासघात कुणी केला हे राज्याला माहीत आहे.यांचं राजकारणच विश्वासघातकी राहिलेलं आहे ते कुठल्या तोंडाने आमच्या नेत्यावर टिका करत आहेत असा सवालही मलिक यांनी केला आहे.